नगर शहरात मनपाचे स्वच्छता अभियान सुरू; कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचले!
अहिल्यानगर : महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी नागरीक, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून, सहभागातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक शनिवारी शहर व उपनगराच्या एकेका भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. शनिवारी महानगरपालिकेने स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. यात या रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे या भागात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्यावर पडलेला कचरा, माती व बांधकाम व पाडकामाचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. रस्त्याच्या दुभाजकाच्यामध्ये साचलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. अभियानात नागरीक सहभागी झाले होते. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करतानाचे शहर स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात नागरीक, सामाजिक संघटनेने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.