जिल्ह्यात क्लास वन, क्लास टू डॉक्टरांची 26 पदे रिक्त
एक जुलै रोजी सर्वत्र डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल मीडियावरून मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. पण नागरिकांचे स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवणाऱ्या डॉक्टरांची शासकीय पदभरती झालेली नाही, याची चर्चा मात्र कुठेही झालेली दिसली नाही. अहमदनगर जिल्ह्यात 50 शासकीय रुग्णालय आहेत. यासाठी 50 पदे मंजूर आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून 13 क्लास वन डॉक्टरची पदे रिक्त आहेत. केवळ 37 क्लास वन डॉक्टरांच्या हातीच जिल्ह्याच्या आरोग्याची नाडी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नामांकनुसार 1000 लोकसंख्येमागे किमान एक डॉक्टर असणं अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्याची लोकसंख्या पाहता शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या कमी आहे. आजही ग्रामीण तसेच अकोलेसारख्या अतिदुर्गम भागात वेळेवर डॉक्टर मिळत नसल्याने रुग्णांना आपले प्राण गमावण्याची वेळ येते. एकीकडे राज्य सरकार विविध योजनेद्वारे आरोग्यसेवा मोफत देत आहे. तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची पुरेशी संख्या नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात 50 शासकीय रुग्णालयांसाठी 50 क्लास वन डॉक्टरांची पदे मंजूर आहे. यातील 37 पदे भरलेले आहेत. तर 13 पदे रिक्त आहे. दुसरीकडे शासकीय रुग्णालयाची देखील अशीच अवस्था असून जिल्ह्यासाठी क्लास टू ची 148 पदे मंजूर आहेत. यातील 135 पदे भरलेली असून उरलेली 13 पदे सध्या रिक्त आहेत.