अडीच दशकांच्या संघर्षानंतर तृतीय पंथीयांना दफनभूमीसाठी जागा
बंद झालेला झालेल्या कचरा डेपोच्या आवारात 15 गुंठे जागा
तृतीयपंथी समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. संघटनेच्या प्रमुख काजल गुरू यांचे प्रयत्न, आंदोलने आणि त्याला प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी पाठपुरावा करत दिलेली साथ आणि महापौर रोहिणी शेंडगे व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी जागा निश्चितीसाठी पुढाकार घेत काढलेला तोडगा यामुळे दफनभूमीसाठी जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला. तपोवन रस्ता परिसरातील मनपाच्या बंद झालेल्या सावेडी कचरा डेपो परिसरात 15 गुंठे जागा देण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. दफनभूमीसाठी तृतीयपंथीयांना स्वतंत्र सुविधा नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. दफन विधीसाठी जागा नसल्याने मृतदेह दफन करण्याची वेळ तृतीयपंथीयांवर आली होती. यातून वादाच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे काजल गुरु यांनी अनेक वर्षांपासून जागेसाठी प्रयत्न सुरू केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आक्रमक पाठपुरावा करत आंदोलने ही केली. जिल्हाधिकारी आयुक्तांनी प्रशासकीय पातळीवर मदत केली. महापौर रोहिणी शेंडगे यांनी महासभेत जागा देण्याचा निर्णय घेतला. मात्र मालेगाव ग्रामस्थांचा विरोध असल्याने जागा कुठे द्यायचे? असा प्रश्न होता,अखेर महापौर शेंडगे व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी पुढाकार घेत सावेडी डेपोत जागा देण्याचा निर्णय घेतला व तृतीयपंथीयांच्या 25 वर्षांच्या संघर्षाला यश आले आहे.