मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने देशपांडेची संतप्त प्रतिक्रिया 

दोन तास खाकी वर्दी बाजूला ठेवून आमच्याशी भिडा 

मुंबई:

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत परिवहन सेवेच्या उद्धाटनासाठी हजेरी लावली होती.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत पोलिसांना आव्हान दिलंय. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.  तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्हीच तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज साहेबांची शिकवण असल्यामुळे आम्ही हे सहन करत आहोत.

याचा अर्थ असा नाही की, आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करु, असे म्हणत त्यांनी पोलिसांना त्यांच्यासाठी काढलेल्या मोर्च्याची ही  आठवण करुन दिली.  संदीप देशपांडे यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांवर हात उचलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी देखील केली आहे. त्याचबरोबर ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारले, त्याच हातांनी सलाम कराल, असेही देशपांडे म्हणाले.