मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळ्याच्या ताबा घेण्यावरुन वाद
जागा मालक व मुख्तारनामा असलेल्या महिलेने नोटीस काळावधीसंपताच जागेचा घेतला ताबा
अहमदनगर
मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळा जागा मालकाकडून खरेदी करुन देखील इतर व्यक्ती जागेचा ताबा सोडत नसल्याने नोटीस काळावधीनंतर गुरुवारी (दि.11 नोव्हेंबर) सकाळी जागा मालक अजित औसरकर व जागेचा मुख्तारनामा दिलेल्या मोनिका पवार यांनी सदर जागा ताब्यात घेतली.
शहरातील मार्केटयार्डमध्ये दोन हजार चारशे चौ.मी. क्षेत्रफळाचे व्यावसायिक गाळा आहे. सदर जागा अजित अनिल औसरकर यांनी मे 2021 मध्ये जागा मालक शशिकला पोपटलाल बोरा व महेश पोपटलाल बोरा यांच्याकडून रजिस्टर खरेदीखताने विकत घेतली होती. जागा मालकाने औसरकर यांना सदर जागेचा ताबा दिला होता. मात्र जागा विकणार्या बोरा यांच्या एका गुंड प्रवृत्तीच्या नातेवाईकाने ही जागा बळकाविण्याचा प्रयत्न करुन ताबा मिळवला. सदर जागेचा ताबा घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळ्याचा ताबा घेणे व इतर सरकारी कामासाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याने या जागेचा मुख्तारनामा 14 सप्टेंबर रोजी मोनिका अशोक पवार यांच्या नावाने करुन दिला असल्याची माहिती जागा मालक अजित औसरकर यांनी दिली.
सदर जागेचा मुख्तारनामा असलेल्या मोनिका पवार यांनी जागेचा ताब न सोडणार्या व्यक्तीस जागा रितसर खरेदी केल्याचे सांगून देखील तो जागा सोडण्यास तयार नव्हता. हा व्यक्ती अर्बन बँक घोटाळ्यात आरोपी असून, जागा न सोडता त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देखील देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. जागा खरेदीनंतर ताबा मिळण्यासाठी सदर व्यक्तीस नोटीस बजावण्यात आली. यानंतर नोटीसचा काळावधी संपल्यावर सदर जागेचा ताबा घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर न्याय मार्गाने जागेचा ताबा न मिळाल्यास सदर जागेसमोर आत्मदहन करणार असून, याला जबाबदार जागा बळकावणारा गुंड व्यक्ती राहणार असल्याचे मोनिका पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे