शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी -शिक्षणाधिकारी अशोक कडूस

गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य व पाच सायकल वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)

 

खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर नजर ठेऊन संधीचे सोने करावे. आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी. बिकट परिस्थिती हा मुद्दा गौण असून, जिद्दीपुढे परिस्थितीला हार मानावी लागते, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले. तर गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब बोडखे परिस्थितीची जाणीव ठेऊन राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

 

 

 

 

 

 

कोरोना काळात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन निराधार, दिव्यांग व मतीमंद मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविणारे तर अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत पाठविणारे नगरचे उपक्रमशील शिक्षक तसेच शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी कोरोनानंतर परीक्षेच्या काळावधीत गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य तर पाच सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात कडूस बोलत होते. बोडखे यांनी त्यांचे मार्गदर्शक आमदार अरुण जगताप व मुलगा विराज बोडखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर खर्चांना फाटा देत पाईपलाइन रोड, श्रीराम चौक येथील पाऊलबुध्दे विद्यालयात हा सामाजिक उपक्रम राबविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, प्रा. अनुराधा चव्हाण, प्रा. संदीप कांबळे, मुख्याध्यापक भरत बिडवे आदी उपस्थित होते.

 

सबस्क्राइब करा 

 

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक भरत बिडवे यांनी मुलांचा वाढदिवस कसा साजरा करावा? याचे उत्तम उदाहरण बोडखे यांनी समाजासमोर ठेवले आहे. वाढदिवसाला इतरत्र पैसे उडवण्यापेक्षा त्याचा योग्य विनियोग केला तर, गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळू शकतो. या भावनेने बोडखे शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब बोडखे म्हणाले की, खडतर बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्याची जाणीव तसेच शिक्षणासाठी आमदार अरुण जगताप यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्य व संस्काराने प्रेरित होऊन सातत्याने गरजू घटकातील हुशार विद्यार्थ्यांना मदत देण्याचे कार्य सुरु आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

 

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये दानाला महत्त्व असून, ते दान मात्र सत्पात्री असले पाहिजे. खर्‍या गरजूंना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. याच भावनेने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संपत्तीपेक्षा मानवता महत्त्वाची असून, हे कोरोनाने सर्वांना शिकवले. शिक्षकांनी दिशा दिल्यास विद्यार्थ्यांची दशा बदलणार असल्याचे सांगितले. तर प्रवाहात टिकण्यासाठी बदलत्या काळानुरुप स्वत: मध्ये बदल करण्याचा संदेश दिला. प्रा. माणिक विधाते यांनी बोडखे यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गरजू घटकातील पाच विद्यार्थ्यांना सायकल तसेच गरजेनूसार स्कूल बॅग, कंम्पास बॉक्स, रजिस्टर व वह्या, शालेय गणवेश, विद्यार्थ्यांच्या पालकांना साडी, सर्व शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट, पेन व मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक परदेशी यांनी केले. आभार विष्णू मगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मोरे, प्रा. विजया नवले, आशा गावडे, जयश्री केदार, महादेव आमले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.