मतदानासाठी साडेसात हजार बाटल्यांतून म्हैसूर शाईचा पुरवठा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३७६३ मतदान केंद्रांवर ७ हजार ५२६ शाईच्या बाटल्या लागणार आहेत. मतदान केल्याची ओळख दर्शविणारी ही म्हैसूर शाई जिल्ह्यातील ३७ लाख ६० हजार ५१२ मतदारांच्या बोटांवर लागणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या याप्रमाणे या शाईचा पुरवठा करण्यात येणार आहे. एका बाटलीमधील शाई ही एक हजार मतदारांच्या तर्जनीवर लावण्यास पुरेशी असून, प्रत्येक बाटलीमध्ये १० मिलिलिटर शाई राहते. राज्य निवडणूक आयोगाकडून या बाटल्या पुरवल्या जातात. खास निवडणुकीत वापरली जाणारी ही विशिष्ट प्रकारची शाई बाजारात कुठेही विकत मिळत नाही. मतदानातील गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच पुनर्मतदान होऊ नये, यासाठी या शाईचा वापर केला जातो. सहजासहजी ही शाई मिटवली जाणे, प्रथमदर्शनी शक्यच नाही. लोकशाहीच्या बळकटीसाठी सशक्त उमेदवार निवडीत ही शाई महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येक मतदार केंद्राला या शाईच्या दोन बाटल्या देण्यात येतात. देशात एकमेव कंपनी, म्हैसूर पेंट्स आणि वार्निश लिमिटेड शाईचे उत्पादन करते. ही कंपनी फक्त सरकार किंवा निवडणूक संबंधित एजन्सींना शाईचा पुरवठा करते.