इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु -योगेश साठे

वंचित बहुजन आघाडीच्या आढावा बैठकीत येणाऱ्या निवडणुकांवर चर्चा

प्रभाग, गट, गण व बुथ बांधणीचे आवाहन; कार्यकर्त्यांचा प्रवेश

नगर (प्रतिनिधी)- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचे सातत्याने अवहेलना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून फातिमा शेख या काल्पनिक पात्र असल्याच्या अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे. फातिमा शेख या सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून बहुजनांच्या शिक्षणासाठी झटत होत्या. धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहे. इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीची जिल्हा, शहर, तालुका आणि युवा आघाडीच्या पदाधिऱ्यांची आढावा बैठक नगरच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी साठे बोलत होते. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलूमे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, सल्लागार जे.डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगादिवे, रविकिरण जाधव, सचिन गायकवाड, पिनु भोसले, युवा उपाध्यक्ष गणेश शिरसाठ, कर्जत शहराध्यक्ष राहुल पोळ, युवा तालुकाध्यक्ष बुवासाहेब चव्हाण, ऑगस्टीन गजभिव, बाळू गजभिव, राहुल गजभिव, अबिद शेख, ॲड. योगेश गुंजाळ, चंद्रकांत नेटके आदीसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन या बैठकीचे प्रारंभ करण्यात आले. पुढे योगेश साठे म्हणाले की, फुले दाम्पत्याला घर सोडावे लागले तेंव्हा फातिमा शेख यांचे बंधू उस्मान यांच्याकडे त्या राहत होते. नायगाव इथून दिलेल्या पत्रामध्ये सावित्रीबाईंनी फातिमाचा उल्लेख केलेला आहे. इतिहासाबद्दल संशय निर्माण करणाऱ्या खोडसाळपणाची दखल आज घेतली नाही, तर काळ सोकावेल, आज फातिमा शेख आहेत, उद्या माता रमाई, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, राजमाता जिजाऊ किंवा सावित्रीबाई फुले असतील. प्रचार तंत्राच्या माध्यमातून खोट्याचे खरे करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग, गट व गण बांधणीचे आवाहन करण्यात आले. बुथ बांधणी करून सक्षम उमेदवाराची चाचपणी करून उमेदवार देण्यासाठी चर्चा करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन दररोज पक्षासाठी वेळ देवून पक्ष बांधणी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोधेगाव ग्रामपंचायत सदस्य सुनील खंडागळे यांच्यासह वसंत साबळे, प्रथमेश सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शहराध्यक्ष हनीफ शेख यांनी आभार मानले.