माजी मंत्री स्व.प्रा.जावेद खान यांची मुंबईत शोकसभा   

मुंबई : 

राज्याचे माजी मंत्री स्व.प्रा.जावेद खान यांची शोकसभा ९ नोव्हेंबर २०२० ला मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्व. प्रा. जावेद खान यांच्याशी ३६ वर्षांपासून माझा परिचय होता. आम्ही दोघेही पहिल्यांदा १९८५ साली एकाचवेळी आमदार म्हणून विधानसभेत आलो. अत्यंत सहृदयी व पारदर्शी असे जावेद खान यांचे व्यक्तीमत्व होते. ते आपल्या सहकाऱ्यांशी नेहमीच मित्रत्वाचे नाते ठेवत असत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन राजकारणातून समाजकारणाचा हेतू त्यांचे पुत्र नदीम जावेद साध्य करत आहेत, अशा भावना थोरात यांनी व्यक्त केल्यात .

 

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, स्व. प्रा. जावेद खान यांचा राजकारणातील प्रवास मी फार जवळून पहिला आहे. ब्लॉक अध्यक्ष ते मंत्री असा त्यांचा राजकारणातील प्रवास मी फार जवळून पहिला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची विशेष रुची होती. बऱ्याच शैक्षणिक उपक्रमांना व संस्थांना त्यांनी प्रोत्साहन दिले. देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायला हवे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये.ही त्यांची नेहमीच इच्छा असायची. मुंबई काँग्रेससाठी ज्यांनी ज्यांनी काम केले आहे, त्यांच्यामध्ये स्व. प्रा. जावेद खान यांचे नाव सर्वात अग्रस्थानी राहील.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, स्व. प्रा. जावेद खान यांची जन्मभूमी उत्तर प्रदेश पण त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. जावेद खान यांनी नेहमीच आपल्या कारकिर्दीत कर्मभूमीला प्राधान्य दिले. कर्मभूमीच्या संस्कृतीशी जुळवून घेणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांना माझी सहृदय श्रद्धांजली. तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यावेळी म्हणाले, विनम्र कसे वागावे, विनम्रपणे जनतेच्या समस्यांमध्ये, त्यांच्या प्रश्नांमध्ये हात घालून त्या कशा सोडवाव्यात, हे माजी मंत्री, स्व. प्रा. जावेद खान यांचे गुण प्रत्येक राजकारण्याने घ्यायला हवेत, आपल्या आचरणात आणायला हवेत. अनेक महत्वाचे निर्णय स्व. प्रा. जावेद खान यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतले.

झोपडपट्टीमध्ये पक्के बांधकाम करायला परवानगी देण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला. एसआरए योजना लागू करण्यामध्ये देखील त्यांची महत्वाची भूमिका होती. प्रा. जावेद खान हे सर्वांना घेऊन पुढे जाणारे नेते होते. त्यांच्या रूपाने या देशाने आणि काँग्रेस पक्षाने एक सर्वसमावेशक, गरिबांच्या प्रश्नांसाठी नेहमीच झटणारा, एक विनम्र नेता गमावला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो…हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

या श्रद्धांजली सभेला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव विनोद दुआ, माजी मंत्री अनिस अहमद, शिवसेना खासदार राहुल शेवाळे व प्रियांका चतुर्वेदी, माजी खासदार संजय दिना पाटील, उपस्थित होते.

प्रसंगी प्रा. जावेद खान यांचे पुत्र नदीम जावेद व वसीम जावेद यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.