गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कर्करोग जनजागृती मोहिम
कर्करोगाचा शून्यावस्थेत शोध घेण्याचा विशेष उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नवीन वर्षात कर्करोग जनजागृतीसाठी आणि त्याचा शून्यावस्थेत (स्टेज 0) शोध घेण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला जात आहे. नागरिकांना कर्करोगाबाबत योग्य माहिती देणे, त्याचा अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर शोध घेणे, त्यावरील उपाययोजना करणे आणि मानसिक आधार प्रदान करणे, या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या उपक्रमात संस्थेच्या वतीने दर 3 महिन्याला कर्करोग निदान शिबिर घेणे, त्याच प्रमाणे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करुन विविध शंका दूर केल्या जाणार आहेत. या मोहिमेत सायकलॉजिस्ट, डॉक्टर आणि कॅन्सर सारख्या रोगातून बरे झालेले रुग्ण या टीम मध्ये कार्यरत राहणार आहेत. यामध्ये कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश सोनावणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमित बडवे, मानसोपचारतज्ञ व कर्करोग विजेती अश्विनी गोलांडे, मॅक्सो-फेशियल सर्जन डॉ. संजय असनानी, स्त्रीरोग व आयुर्वेदिक तज्ञ डॉ. सिमरनकौर वाधवा, दंतचिकित्सक डॉ. मानसी असनानी, पत्रकार सुदाम देशमुख, मीडिया मॅनेजमेंट हरमनकौर वधवा आदींसह या उपक्रमात शहरातील नामांकित डॉक्टर व तज्ञांचा समावेश आहे.
या विशेष उपक्रमासाठी गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानचे हरजीतसिंग वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, प्रशांत मुनोत, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, गुलशन कंत्रोड, मुनाशेठ जग्गी, सनी वधवा, सुनील थोरात, राजू जग्गी, सोमनाथ चिंतामणी, कैलाश नवलानी, राजा नरंग, सुनील छाजेड, विपुल शाह, दलजीतसिंग वधवा, राहुल बजाज, कैलाश नवलानी, दमोधर माखिजा, करण धुप्पड, किशोर मुनोत, राजेश कुकरेजा, मनू कुकरेजा, सिमर वधवा, प्रमोद पंतम, शरद बेरड, सुनील मेहतानी, दीपक मेहतानी, संदेश रपारिया, गोविंद खुराणा, अमरजितसिंग वधवा, करण धुप्पड, कबीर धुप्पड, कैलास ललवाणी आदी कार्यरत आहेत.
कर्करोगाचे लवकर निदान का महत्त्वाचे आहे?
कर्करोग हा प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला, तर त्यावर उपचार सोपे आणि अधिक प्रभावी ठरतात. अनेकदा कर्करोगाची लक्षणे सूक्ष्म स्वरूपात असतात, ज्यामुळे ती दुर्लक्षित केली जातात. म्हणूनच प्रतिष्ठानतर्फे जनतेला साध्या लक्षणांकडेही लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणतीही असामान्य गाठ किंवा सूज, सतत होणारी वेदना किंवा अस्वस्थता, त्वचेवर दिसणारे बदल किंवा नवीन डाग, अनपेक्षित वजन कमी होणे, यापैकी कोणत्याही लक्षणांचा अनुभव येत असेल, तर त्वरित वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
–
कॅन्सरवर शून्यावस्थेत मात करणे कसे शक्य आहे?
कॅन्सरला शून्यावस्थेत शोधून काढणे म्हणजे त्याचा उपचार लवकरात लवकर सुरू करणे. यामुळे गंभीर अवस्थेत जाण्याची शक्यता कमी होते आणि महागड्या उपचारांची गरज भासत नाही. अगदी साध्या चाचण्या आणि नियमित तपासण्यांमुळे हे शक्य आहे.
–
नवीन उपक्रम आणि शिबिरे:-
या उपक्रमात प्रतिष्ठानतर्फे दर तीन महिन्यांनी कर्करोग निदान शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये लोकांना कर्करोगासंबंधित चाचण्या आणि त्यासंबंधी मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय, कर्करोगातून बरे झालेल्या व्यक्तींशी संवाद साधून प्रेरणा घेण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे.