विधानसभा निवडणूक होईपर्यंत नेत्यांचा टाइमपास

अहमदनगर : शरद पवार मागील सात- आठ महिन्यांपासून महाराष्ट्र जळत असताना गप्प बसले होते. आता निवडणुका तोंडावर आल्यावर सर्वांनी एकत्र बसले पाहिजे, असे सांगत आहेत. पुढच्या पंधरा-वीस दिवसांत हे लोक टाइमपास करतील, निवडणुका काढून घेतील, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अहमदनगर येथे दिला. शुक्रवारी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांचा मेळावा नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. जरांगे पाटील यांनी आरोप- प्रत्यारोप करू नयेत. संविधानिक पद्धतीने बोलले पाहिजे.आमचादेखील आरोप आहे की, राजेश टोपे यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांना शरद पवार पाठबळ देतात. अशी टीका हाके यांनी केली.मागील तीन वर्षांपासून ओबीसी आरक्षणावर कोर्टात सुनावणी होत नाही. आता विद्यामान नगराध्यक्षांना पाच वर्षांचा कालावधी वाढून दिला आहे. पंचायतराजमधील निवडणुका न झाल्याने ओबीसी अन्याय झाला आहे. हे सरकार विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ओबीसी आरक्षण संपून टाकतील, अशी टीका हाके यांनी केली. ते पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणावर हल्ला होत असताना आमदार, खासदार सभागृहात बोलले का? याचा जाब आम्ही प्रत्येक आमदारास विचारणार आहोत. जर हे आमदार सभागृहात बोलले नसतील, आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नसेल आणि स्वजातीय आंदोलनाला पाठिंबा देत असतील, तर विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज अशा नेत्यांना जागा दाखवेल, असा इशारा हाके यांनी दिला.