वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांची भिंगार परिसरातून प्रचार रॅली

मतदारांच्या घरोघरी जावून घेतल्या गाठी-भेटी; बहुजन समाजाचा प्रतिसाद

संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा -हनीफ शेख

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ भिंगार परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शेख यांनी मतदारांच्या घरोघरी जावून गाठी-भेटी घेतल्या. तर मतदारांनी देखील वंचितच्या उमेदवारास प्रतिसाद दर्शविला.
या प्रचार रॅलीत जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, बौध्दाचार्य दीपक पाटोळे, शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, उपाध्यक्ष प्रविण ओरे, शहर जिल्हा महासचिव अमर निर्भवणे, शहर संघटक अक्षय शिंदे, प्रदीप भिंगारदिवे, सुरेश पानपाटील, सिद्धार्थ पवार आदी सहभागी झाले होते.
उमेदवार हनीफ शेख म्हणाले की, संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांनी संधी द्यावी. शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात असहिष्णुता निर्माण झालेली असताना सर्वसामान्य नागरिकांना भितीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. नेते मंडळी गुंडगिरीची भाषा वापरत असून, शहराचा विकास खुंटला आहे. सेवा, संरक्षण व विश्‍वासाची हमी देणारा वंचित घटकातील उमेदवार सर्वसामान्यांना पर्याय देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले की, दलित, मुस्लिम, आदिवासी या वंचित घटकातील समुदायाला नेतृत्व देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. या वर्गाला सत्ताधारी व इतर पक्षांनी फक्त मतांसाठी वापर केला. राजकारणात सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य वंचित बहुजन आघाडी करत असल्याचे त्यांनी सांगितले.