वृद्धांना मिळणार घरीच आरोग्यसेवा!

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘नॅशनल जेरियाट्रिक हेल्थ केअर’ (वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम) कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी दहा लाख ४९ हजार २५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांतील प्रादेशिक आरोग्य सेवा केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयात वृद्ध रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जे वृद्ध उपचारांसाठी रुग्णालयात येऊ शकत नाहीत; त्यांना घरीच आरोग्य सेवा देणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत आरोग्य विभागामार्फत आगामी काळात यावर प्रभावी काम केले जाणार आहे.

वृद्धापकाळात लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते, त्यामुळे आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयात आठवड्यातून एकदा ‘जेरियाट्रिक क्लिनिक’ (वृद्धांसाठीचा दवाखाना) चालवले जातो. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत वृद्धांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून विविध तपासण्या केल्या जातात. यामध्ये वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या विविध समस्या लक्षात घेऊन आरोग्य तपासणी केली जाते आणि त्यानंतर रुग्णांच्या गरजेनुसार विविध स्तरावर उपचार केले जातात.

आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले की, अनेक बाबतीत वृद्धांना घरपोच आरोग्य सेवा पुरवण्याची गरज आहे. ती
अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. या कार्यक्रमात वृद्धांना प्राथमिक काळजी आणि प्रतिबंधात्मक, निदान आणि उपचार सुविधा, वृद्धांच्या आरोग्य समस्या ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम करणे यांचा समावेश आहे आणि गरजेनुसार वृद्ध रुग्णांना प्रादेशिक जेरियाट्रिक केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची सुविधादेखील दिली जाते.