अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू
चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामस्थांचे आंदोलन
अहिल्यानगर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने आजपासून (शुक्रवार) जिल्हा परिषदेसमोरबेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात सरपंच शरद पवार, उपसरपंच विश्वसागर कोकाटे. दत्तू रामभाऊ धुळे, अरुण दवणे. महादेव खडके. बन्सी खेडकर, शंकर सरोदे, विजय कोकाटे, भारती इथापे, द्वारकाबाई देवकर, द्वारकाबाई जाधव, आशाताई उल्हारे, सौ. थोरात, सौ. गाडे ताई, सौ. कांबळे ताई, लांडगे मावशी, ठकाजी गाडे, नागनाथ जाधव, दिलीपभाऊ पवार, शंकर जगताप यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. रात्रीतून ताबा मारलेला साई मंदिर ते पिंपळा रस्ता खुला करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. चिचोंडी पाटील येथील प्रभाग क्रमांक १ मधील साईनगरमधील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर अनधिकृतपणे ताबा मारून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला यांची बसस्थानक, बाजारात, शेतात जाण्या-येण्याची गैरसोय होत आहे. ताबा मारून रस्ता बंद केल्याबाबत स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, पदाधिकारी यांनी अनेक वेळा पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय यांना अर्ज करूनही सदर अतिक्रमण काढून रस्ता खुला केलेला नाही,
त्यामुळे आजपासून सरपंच पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. दुपारी उशिरापर्यंत या उपोषणावर तोडगा निघालेला नव्हता.