अखेर केडगावच्या जेएसएस स्कूलला 1 लाखाचा दंड
परवानगी नसताना अनाधिकृतपणे माध्यमिकचे वर्ग भरविणे भोवले; महापालिका शिक्षण विभागाने काढले पत्र
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला 1 लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे.
रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केडगाव येथील बालाजी कॉलनी, अंबिका नगर येथे जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला पूर्व प्राथमिक मान्यता असताना विनापरवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरवले जात असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची महापालिका शिक्षण विभागाने दखल घेऊन तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना काढले होते. तर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिला होता.
मात्र सदर शाळेतील विनापरवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग बंद केले नसल्याने महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी यांनी संस्थेमार्फत शासनाची मान्यता नसताना, अनाधिकृतपणे माध्यमिकचे वर्ग भरविल्याने बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 (5) अन्वये 1 लाख दंडाचे आदेश काढले आहे.
तसेच तक्रारदार कांबळे यांनी सदर शाळेच्या आवारातील पुरुष कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतलेले नाही, शाळेत तक्रारपेटी उपलब्ध नाही, शाळेत सखीसावित्री समिती फलक नाही, शैक्षणिक पात्रता धारक शिक्षक वर्ग नाहीत, शाळेत मुलांसाठी खेळाचे मैदान नाही, मुलांसाठी आवश्यक भौतिक सुविधा नसल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केलेली आहे.
जेएसएस गुरुकुल स्कूलने पालकांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने माध्यमिकचे वर्ग सुरु केलेले आहे. मात्र संस्थेच्या गैरकारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळणारा हा गंभीर प्रकार असून, संस्था चालकांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे. -मेहेर कांबळे (तक्रारदार तथा जिल्हा संघटक, रिपब्लिकन युवा सेना)