अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध
आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची मागणी मुली व महिलांना घराबाहेर पडण्यासाठी चिंता वाढली
अहमदनगर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन झालेल्या हत्येचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. महिला व मुलींवर वारंवार बलात्काराच्या घटना उघडकीस येत असताना यामधील आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची मागणी क्लबच्या महिलांनी केली.
याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उज्वला भंडारी, सचिव प्रभा खंडेलवाल, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन सायली खानदेशी, पुष्पा कोरे, वैजयंती जोशी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, वैशाली रायते, मधुबाला चोरडिया, दीप्ती चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या.
कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या प्रकरण ताजे असताना बदलापूर येथील एका शाळेच्या तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे समाजाला व माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली आहे. या घटनांमुळे समाजावर वाईट परिणाम होत असून, आरोपींच्या मनात कायद्याचा धाक नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. अशा घटनांमुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून, महिला व मुलींच्या मनात भय निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मुली व महिलांना घराबाहेर पडण्यासाठी चिंता वाढली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि महिलांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची गरज असल्याचे स्पष्ट करुन, बलात्कार प्रकरणाचा तातडीने निकाल लाऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.