मुख्यमंत्री लाडकी बहीणसोबतच, आता लाडक्या भावालाही मिळणार विद्यावेतन

बारावी उत्तीर्ण पदवीधरांसाठी योजना

पंढरपूर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. मुलांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये दिले जाणार असून डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8000 रुपये मिळणार आहेत. तसेच पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळेल. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे. विरोधकांनी या योजनेवर टीका करत, लाडक्या भावासाठी काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला बारावी डिप्लोमा आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना दरमहा विद्या वेतन देणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रशिक्षण भत्ता आपण देणार आहे. हा इतिहासातील पहिला निर्णय आहे. वर्षाला 10 लाख युवकांना याचा लाभ मिळेल. जी मुले अप्रेन्टिसशिप करतील त्यांना त्या कंपनीमधील अनुभवामुळे काम मिळेल. पुन्हा पुढच्या वर्षी दहा लाख जण येतील. अशी ही साखळी तरुण युवकांसाठी निर्माण केली आहे. सरकारचा कुशल कामगार तयार करण्यावर भर आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात कुशल तरुणांची संख्या वाढेल. महायुती सरकार गरिबांचे आहे. लाडक्या बहिणीसारखे भाऊदेखील लाडके आहे. असेही शिंदे यावेळी म्हणाले.