‘लाडकी बहीण’ची अंमलबजावणी होईपर्यंत, नवीन कामांना निधी नाही

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर करण्यात आली होती. यासाठी 45 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नवीन कामांना निधी मिळणार नसल्याच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागांना देण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सरकारकडून दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. आतापर्यंत सुमारे दीड कोटी महिलांनी अर्ज दाखल केले असून ही लाभार्थ्यांची संख्या अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी वित्त विभाग कामाला लागलेला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही कामांना सध्या तरी निधी उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या योजनामागून योजना जाहीर होत आहे, मात्र यासाठी निधींची तरतूद केली जात असताना सध्या सुरू असलेल्या विकास कामांची देयकेही थकलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची एक बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीदरम्यान थकलेल्या देयकांचे पैसे लाडकी बहीण या योजनेसाठी पहिला हप्ता 19 ऑगस्ट रोजी जमा झाल्यानंतरच दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.