जिल्हाभर महिलांचा जल्लोष; बँकांपुढे रांगा

लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळण्यास प्रारंभ

अहमदनगर, ता. १६ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे मिळण्यास प्रारंभ झाला आहे. बहुतेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने आज जिल्हाभर महिलांनी जल्लोष केला. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंकिंग झालेले नसेल, त्यांना पुढील महिन्यात तीन महिन्यांचे एकदम पैसे दिले जाणार आहेत.रक्षाबंधनाचा सण जवळ आला असताना राज्यातील महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना आगळीवेगळी भेट दिली आहे. ज्यांचे बैंक खाते लिंक झाले नाहीत, त्यांना पैसे मिळाले नसले, तरी लिकिंगनंतर ते जमा होतील, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले.अंमलबजावणीची आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विनायक देशमुख, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.विखे पाटील म्हणाले, की रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे उद्रेक झाला आहे. प्रशासन त्यांचे काम करत आहे.