लहुजी शक्ती सेनेने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत करुन शहरात केला जल्लोष

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत करुन शहरात जल्लोष करण्यात आला. सिद्धार्थनगर येथील लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून फटाक्यांच्या आतिषबाजीत पेढे वाटून या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, ज्ञानेश्‍वर जगधने, जयवंत गायकवाड, राजाराम काळे, नामदेवराव चांदणे, विजय पठारे, सुनील सकट, सिताराम शिरसाठ, प्रवीण वैरागर, लहू खंडागळे, किरण कणगरे, संतोष उमाप, तुषार गायकवाड, गणेश लोंढे, सुभाष शिंदे, अजय डाडर, बाबासाहेब शिरसाठ आदींसह मातंग समाजबांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, लहुजी शक्ती सेनेने मातंग समाजाच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरणाची मागणी अनेक वर्षापासून सातत्याने लावून धरली होती. आक्रमकपणे ही मागणी लावून धरण्यात आल्याने या न्याय मागणीला यश आले आहे. या निर्णयाने समाजाला न्याय मिळणार असून, मातंग समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात जाणे म्हणजे, बाबासाहेबांच्या संविधानाचा अवमान असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय पठारे यांनी अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील काही जातींनी स्वतःची प्रगती साधली असली तरी या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. यासाठी लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे सर्व मातंग समाज आभार मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.