लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी
गोकुळाष्टमी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम श्रीकृष्ण व राधेच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विद्याद्यार्थ्यांनी सादर केलेले गवळण व कृष्ण जन्माच्या गीताने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. गोविंदाने पथकाने हदीहंडी फोडताच हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की! च्या जयघोषाने शाळेचा परिसर दणाणून निघाला. यावेळी विद्यार्थी एकच जल्लोष केला.
गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमा निमित्त शाळेच्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून फुलांची व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. तर शाळेच्या मैदानात हा दहीहंडीचा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमास प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुजाता दोमल, प्रदीप पालवे, मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, शीतल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी भजन व गवळण सादर केली. तर कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला…, राधा ही बावरी आदी विविध गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली. शिवाजी लंके म्हणाले की, दहीहंडी हे एकतेचे प्रतिक आहे. देशात विविधतेने नटलेल्या एकात्म भारताचे दर्शन अशा सण उत्सवातून घडत असते. तर सर्व समाजबांधव एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.