केडगावला राजमुद्रा प्रतिष्ठानचा 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा
भव्य मुर्तीने वेधले भाविकांचे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोड, भूषणनगर येथे गणेशोत्सवानिमित्त राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा साकारला आहे. भव्य अशी ध्यानस्थ शंकराची मुर्ती भाविकांचे लक्ष वेधत आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. रात्री मुर्तीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भगवान शंकर साक्षात अवतरल्याचा भास या देखाव्यातून होत आहे. हा देखावा पाहण्यासाठी केडगावसह शहर व पंचक्रोशीतील भाविक गर्दी करत आहे. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुजय अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे.