आजपासून चारही प्रभाग कार्यालयात, जन्ममृत्यूसह विवाह नोंदणी सुविधा उपलब्ध

महापालिकेकडून कर्मचारी नियुक्त : नागरिकांचे हेलपाटे वाचणार

नगर : महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणीची सुविधा आता चारही प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. आजपासून म्हणजे एक ऑगस्टपासून नागरिकांना त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयातच जन्म व मृत्यू तसेच विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने कर्मचारी नियुक्त केले आहेत. जन्म व मृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणी सध्या जुन्या महापालिकेत केली जाते. संपूर्ण शहरात एकच केंद्र असल्याने येथे नागरिकांची गर्दी होते. परिणामी नागरिकांना वेळेत दाखले मिळत नाहीत. तसेच केडगाव, बोलेगाव, तपोवन रस्त्यावरील नागरिकांनाही दाखल्यांसाठी जुन्या महापालिकेत जावे लागते. त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांनी आता महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयातच हे दाखले देण्याचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी प्रभाग समिती कार्यालयातच कर्मचाऱ्यांना जबाबदारी निश्चित करून दिली आहे. आजपासून ही सेवा कार्यरत होणार आहे. शहराचा उपनगर भाग मोठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा मिळावी यासाठी जन्म व मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी कामाचे विकेंद्रीकरण करून प्रभाग समिती कार्यालयात आजपासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातून वेळेत दाखले घेता येतील. तसेच नागरिकांचाही वेळ वाचेल. नागरिकांनी जुन्या महापालिकेत आता गर्दी करू नये. असे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.