मविआचे जागावाटपाचे गणित सुटले : काँग्रेस १०५, उद्धवसेना ९५, शरद पवार गट ८० जागा लढणार
जागावाटपाचा गोंधळ अखेर शमला
काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुहाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. तीन पक्षांमधील वादाच्या जागांवरील मोजक्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी जवळपास पाच तास मविआच्या नेत्यांची बैठक ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये सुरू होती. बैठकीत आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धवसेनेने ज्या जागांवर दावा केला होता, त्याचा तिढा सोडवण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि उद्धव सेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जागा वाटपाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे. त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८० च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले दीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत मविआला पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांच्या नेत्यांशीही जागा वाटपाची चर्चा करण्यात आली. यात डावे पक्ष आणि इतर पक्षांच्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना मविआसोबत येण्याची विनंती तीनही पक्षाच्या नेत्यांनी केल्याचे समजते. या बैठकीत कोणत्या पक्षाने किती व कोणत्या जागालढवायच्या यावर शिक्कामोर्बत झाले. त्याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी केली जाणार आहे.