पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे; आमदार काशिनाथ दाते 

बुधवार दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथील विजयगड या निवासस्थानी पारनेर – नगर मतदार संघातील आमदार काशिनाथ दाते सर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड उपस्थित होते. पारनेरच्या पठार भागाचा पाण्याच्या दोन टी. एम. सी. संदर्भात तसेच सुपा एमआयडीसीमध्ये तरुणांना रोजगार व दहशतमुक्त एमआयडीसी व्हावी यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याबरोबर पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार काशिनाथ दाते सर आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी चर्चा केली. पारनेर पठार भागाचा दोन टीएमसी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा आग्रह केला. पठार भागाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यास पारनेर तालुक्याची दुष्काळी ओळख काही अंशी का होईना कमी होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, यामुळे हा प्रश्न सोडवावा याचा आग्रह आमदार काशिनाथ दाते यांनी केला. तसेच सुपा एम आय डि सी मध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, एमआयडीसीचा विस्तार झाल्यास माझ्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळेल, या रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सुबलता येईल, आमचे तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. त्यामुळे एमआयडीसी कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या लक्षात आणून दिले. पारनेर – नगर मतदारसंघातील प्रलंबित असणारे सर्व कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे आमदार दाते यांनी सांगितले.