अहमदनगरमधील मुनोत पतिपत्नी हत्याकांड : गुन्हेगाराला फाशीऐवजी जन्मठेप
दुर्मिळातील दुर्मिळ खटला नसल्याने फाशी रद्द
महाराष्ट्रात गाजलेल्या अहमदनगरमधील व्यापारी रमेश मुनोत यांची त्यांच्या पत्नीसह २ डिसेंबर २००७ च्या रात्री साकेत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुनोत यांच्या बंगल्यात घुसून रात्रीची ड्युटी करणाऱ्या चौकीदाराला बांधून दाम्पत्याची हत्या केली. रमेश मुनोत यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले, तर त्यांची पत्नी चित्रा यांना खुर्चीला बांधून त्यांचा गळा चिरण्यात आला होता. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चौकीदाराची फाशीची शिक्षा नुकतीच रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द केली.२००७ मध्ये अहमदनगर येथील व्यापारी रमेश मुनोत आणि त्यांची पत्नी चित्रा यांच्या निघृण हत्येप्रकरणी चौकीदार शिवकुमार साकेतला दोषी ठरवण्यात आले होते. साकेतने त्याचे दोन मित्र, मुनोत यांच्या तीन माजी कर्मचाऱ्यांसह दरोडा आणि खुनाचा कट रचून तो तडीस नेला होता. कनिष्ठ न्यायालयाने सर्व सहा दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर मुंबई उच्च न्यायालयाने साकेत याच्या शिक्षेमध्ये वाढ करून फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने विश्वासघात हा त्रासदायक घटक असल्याचे नमूद केले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयावर असहमती दर्शवली. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवताना, फाशीची शिक्षा बाजूला ठेवली आणि जन्मठेपेची शिक्षा बहाल केली. साकेतची भूमिका गुन्ह्यातील इतर आरोपींसारखीच होती, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत त्याला वेगळी कठोर शिक्षा देता येणार नाही, असे नमूद केले.