उद्यापर्यंत नवीन मतदारांना नोंदणीची संधी!
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली, तरी नवयुवकांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार १९ लाख ३६ हजार ९००, तर महिला मतदारांची संख्या १८ लाख २३ हजार ४११ आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी १५ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली. या निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून अधिसूचना जारी होणार आहे. २९ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, ३० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी, तर ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असली, तरी अजूनही नवीन मतदारांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. ३० ऑगस्टला विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती.