निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या पैंजने वेधले लक्ष

भीक नको, पण कुत्रा आवरा या जनतेने स्विकारलेल्या भीन-कुआ तंत्राचा शनिवारी उलगडा होणार

नगर (प्रतिनिधी)- शनिवारी (दि.23 नोव्हेंबर) जाहीर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वकीलांनी लावलेल्या अफलातून पैंजकडे सर्वच वकिलांचे लक्ष लागले आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार व कोण उमेवार निवडून येणार आणि कोण पडणार हे उत्सुकतेचे असले तरी, यावर विविध पैंज लागल्या आहेत.
ॲड. सुभाष धामणे यांनी असा मुद्दा मांडला की, महाराष्ट्रात ढब्बू मकात्यामुळे व मतकोंबाडांची मतदार अक्कलमारी तंत्रातून देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बहुमताने यश आल्या शिवाय राहणार नाही. त्यांचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार असल्याचे स्पष्ट केले. ॲड. कारभारी गवळी यांनी त्यांच्या विरोधात लावलेल्या पैंजमध्ये स्पष्ट म्हंटले की, महाराष्ट्रातील जनतेने कालच्या मतदानामध्ये भीन-कुआ याचा अभ्यास करून, संपूर्ण महाराष्ट्रात डिच्चू कावा आणि डिच्चू फत्ते तंत्र वापरले आहे. त्यामुळे 23 तारखेच्या निकालात राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे) व काँग्रेस यांना बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये भीन-कुआ म्हणजे भीक नको, पण कुत्रा आवरा या गोष्टीचा महाराष्ट्रातील जनतेने वापर केला आहे.
महायुतीने मनाला येईल त्याप्रमाणे जनतेच्या पैश्‍यांची उधळपट्टी सुरू ठेवली आहे. उद्या सरकारी तिजोरीत सरकारी नोकरांचा पगार देण्यासाठी सुद्धा पैसा राहणार नाही आणि त्यातून प्रत्येक कामासाठी सरकारी नोकर भ्रष्टाचाराचा दर वाढवून लोकांचे शोषण केल्याशिवाय राहणार नाही. या एकाच भीतीमुळे महायुती सरकारला जनतेने नाकारल्याचे स्पष्ट होणार असल्याचेही ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
या पैंजमध्ये लोकभक्ती, ज्ञानभक्ति आणि कर्मभक्तीचा महाराष्ट्रात वाणवा आहे. पुढारी फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात, पण जनतेच्या भल्यासाठी त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. फक्त महाराष्ट्रात सध्या सत्तापेंढारी एकमेकांविरुद्ध लढत आहेत आणि त्यामुळे पुढील पाच वर्षे जनतेचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कालच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि धार्मिक स्थळांमध्ये जाऊन सुद्धा मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. असे दोन्ही बाजूने कबूल करण्यात आले. नगर दक्षिण मतदार संघात डॉ. सुजय विखे यांना पराभूत व्हावे लागले. सध्याचे खासदार लंके हे नकारात्मक मतातून निवडून आलेले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी देखील काही एक भरीव कामगिरी केली नाही. परंतु पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला देखील घराणेशाही वाढवता येईल यासाठीच प्रयत्न केला. एकंदरीत महाराष्ट्रातील जनता लोकशाही असून देखील अतिशय दुःखी आहे, ही बाब वकिलांच्या पैंजेतून पुढे आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.