सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाणार -खासदार निलेश लंके

अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्‍नांवर चर्चा

सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तांना दरमहा 1 हजार वैद्यकीय मदत देण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- शिक्षकाचा मुलगा असल्याचा अभिमान असून, शिक्षकांच्या शिस्तीत व संस्कारात घडलो आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना न्याय देऊ शकलो नाही, तर त्या राजकीय पदावर राहण्याचा मला अधिकार नाही. सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न केंद्र स्तरावर सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जावून केंद्रीय अर्थमंत्री यांच्यासह चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन खासदार निलेश लंके यांनी दिले.
सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना असलेल्या अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार लंके बोलत होते. शहरातील टिळक रोड, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन.डी. मारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाप्रसंगी जि.प. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, राज्य सचिव नामदेवराव घुगे, नगर जिल्हाध्यक्ष द.मा. ठुबे, सरचिटणीस बन्सी उबाळे, अशोक ढसाळ, वि.नी. कोल्हे, अधोक धासळ, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे वसंतराव सबनीस, अनंतराव पाटील, म.रा. सोनवणे, वारे, मधुकर साबळे, डी. आर. पाटील आदींसह पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे खासदार लंके म्हणाले की, समाज घडविणारे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे प्रश्‍न सोडविणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. संघटनेचे शिष्टमंडळ, खासदार शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्तांच्या प्रश्‍नावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एन.डी. मारणे म्हणाले की, सेवानिवृत्त शिक्षकांचे जीवन सुकर होण्यासाठी संघटनेचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. प्रश्‍न सुटत नसल्याने ते गंभीर बनत चालले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागून त्यांना न्याय मिळवून देण्यात आला आहे. इतर प्रलंबित मागण्यांसाठी देखील हा संघर्ष सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बन्सी उबाळे यांनी अधिवेशनात प्रास्ताविक करुन अहवाल वाचन केले. द.मा. ठुबे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन मागील कार्याचा आढावा घेतला. तर भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली. या अधिवेशनात मे 2024 ला व त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
अंशराशीकरण मुदत 15 वर्ष ऐवजी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 11 वर्षे 6 महिने व्हावी, 1 जुलै 2024 च्या केंद्राच्या निर्णयाप्रमाणे 3 टक्के वाढ मिळावी, निवडश्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करुन, वेतन निश्‍चिती करणे, 65 वय झालेल्यांना 5 टक्के पेन्शन वाढ होण्याबाबत व केंद्र शासनाप्रमाणे सेवानिवृत्तांना किमान 1 हजार रुपये दरमहा वैद्यकीय मदत मिळण्याबाबत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे स्पष्ट करण्यात आले. या अधिवेशनात जिल्ह्यातील दोन ते अडीच हजार शिक्षक पेन्शनर्स सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यभान काळे, किशोर हारदे, रामकृष्ण बोरुडे, सुनील घोलप, बबन कुलट, भाऊसाहेब काळे, सुनील सोनवणे, अविनाश गांगर्डे, नवनाथ बोरुडे, भीमसेन चत्तर, बेबीताई तोडमल, सविता साळुंखे, शामला साठे यांनी परिश्रम घेतले. आभार भाऊसाहेब डेरे यांनी मानले.