अवघ्या देशाचे लक्ष नीरजच्या, भाल्याच्या टोकावर

''वंडर बॉय" सज्ज

परिस : टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकाचा पॅरिसमध्ये बचाव करण्यासाठी भारताचा ”वंडर बॉय” नीरज चोप्रा सज्ज झाला आहे. मंगळवारपासून म्हणजे उद्यापासून तो आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. अंतिम फेरी आठ तारखेला होणार असली तरी त्याच्या तयारीची एक झलक पात्रता फेरीत पाहायला मिळू शकते. ऑलिंपिकमध्ये यशस्वी कामगिरी करण्यासाठी नीरजने पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली होती. २०१३ मध्ये ज्यावेळी नीरजने राष्ट्रीय युवा स्पर्धेत भाग घेतला त्यावेळी निश्चितच ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न उराशी बाळगले असेल. मात्र, सलग दोन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाचा विचार त्याने बहुधा त्यावेळी केला नसेल. आता ही ऐतिहासिक कामगिरीची वेळ येऊन ठेपली आहे. पात्रता फेरीत नीरजचा ‘ब” गटात समावेश असून त्याच्या गटात जर्मनीचा युवा भालाफेकपटू मॅक्स डेहनिंग, पाकिस्तानचा अर्शद नदीम, माजी विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.अंतिम फेरीसाठी ८४ मीटर अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.