भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीचा संवाद यात्रा उपक्रम
अहमदनगर : भटके विमुक्त आदिवासी समाजाची जनगणना करावी, स्वतंत्र मंत्रालय व बजेट मध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी गायरान, गावठाण, वनजमिन व इतर निवासी अतिक्रमणांचे नियमितिकरन करण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी भटके विमुक्त आदिवासी, संयोजन समितीच्या वतीने ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना लेखी निवेदन दिले. भटके, विमुक्त, आदिवासी संयोजन समितीचे सदस्य आणि भटके विमुक्त समाजातील ४२ जातींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. २८ ऑगस्ट पासून फुले वाडा, पुणे येथून निघालेली ही संवाद यात्रा सोलापूर, सांगली, सातारा मार्गे अहमदनगर येथे बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी पोहोचली. संयोजन समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली असून आम्हाला गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्यासाठी ७२ बर्षे होत असताना आजही तेच दारिद्र आमच्या वाटेला आलेले आहे. आजूनही भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाला जात, वर्गच्या आधारावर मोठ्या प्रमाणात विषमता आणि अन्याय अत्याचारला सामोरे जावे लागते. त्याच बरोबर हा समाज अतिशय मागसलेला असून वंचित घटकात आहे. यामुळे मूळ भटक्या जमाती या अन्न, वस्र, निवारा, शिक्षण रोजगार या मानवी आणि संविधानिक हक्कापासून वंचित आहे. गेल्या ७२ वर्षात या वंचीत समुहाचे प्राथमिक, मुलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांची सतत पायमल्ली होत आहे. हा समुह विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील समस्त भटके विमुक्त आणि आदिवासी समुहाच्या हक्कांविषयी ७२ व्या विमुक्त दिनानिमित्त आम्ही राज्यव्यापी संवाद यात्रा काढली आहे. या संवाद यात्रेत भटके विमुक्त आणि आदिवासींच्या प्रमुख मागण्याचे, प्रश्नाचे निवेदन आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनास देऊन, जाब विचारत आहेत. ही संवाद यात्रा महाराष्ट्रातील भटके विमुक्त आणि आदिवासी मधील सर्व जातसमुहांचे प्रतिनिधित्व करीत आहे. यामध्ये १०० हुन अधिक संस्था, संघटना सहभागी झालेल्या आहेत.यासोबतच संवाद यात्रेमध्ये भटके विमुक्त आणि आदिवासी बांधवानी आपल्या सामाजातील पारंपरिक नृत्य संगीत वाद्यवादन अशा विविध सांस्कृतिक परंपरेचे जतन करत त्यांचे सदरीकरण याठिकाणी केले.
ही संवाद यात्रा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, ठाणे मार्गे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर जाणार आहे. तेथे संबंधित खात्याचे मंत्र्यांसोबत भटके विमुक्त व आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा व विचार विनिमय होणार आहे. प्रत्येक जिल्हातील भटके विमुक्त व आदिवासींच्या पालांवर व वाड्या वस्त्यांवर जाऊन जनजागृती करणार आहेत. अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात पद्मश्री पोपटराव पवार व सी एस आर डी चे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांनीही भटके विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांना पाठिंबा व शुभेच्छा दिल्या. वेळ प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या सोबत भटके विमुक्त संयोजन समितीच्या सदस्यांची चर्चा घडवून आणू असे पद्मश्री पोपटराव पवार यावेळी म्हणाले. या संवाद यात्रेत १२ बलुतेदार, नाभिक समाज संघटना, ओबीसी, व्ही जे एन टी संघटना, अहमदनगर सोशल फोरमच्या संध्या मेढे व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.