पारनेरच्या ग्रामपंचायतीमध्ये कामांच्या शासकीय कपातीत अपहार झाल्याचा आरोप

कामांची दप्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामांच्या शासकीय कपातीत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप करुन तातडीने कामांची दप्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयास दिले. याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, पारनेर पंचायत समितीचे अधिकारी यांनी संगणमत करून अनेक ग्रामपंचायतीत झालेल्या कामांच्या शासकीय कपातीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केला असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायत मंजूर कामांची दप्तर तपासणी करण्यात यावी, पूर्ण झालेल्या कामांची तपासणी व्हावी, ती कामे पूर्ण झालेली असल्यास शासकीय कपाती करण्यात आलेल्या रकमेची दप्तर तपासणी ग्रामपंचायत निहाय करावी व दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.