शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार
ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युवकांमध्ये केली जाणार जागृती
पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार
नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल रेन गेन बॅटरीचा उपयोग निर्णायक ठरणार आहे. याच्या प्रचार-प्रसारासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
सध्याच्या राज्यकर्त्यांना ग्लोबल वार्मिंग आणि दुष्काळावर मात करण्यासाठी शेती आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत फारशी आस्था नाही. त्यामुळे सत्याग्रह किंवा मोर्चा काढून उपयोग होत नाही. महाविद्यालय आणि विद्यापीठातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांच्या ज्ञान व व्हिजनचा उपयोग करुन ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणीटंचाई याबाबतचा प्रश्न सोडवता येणार आहे. यासाठी रेने गेन बॅटरीवर नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आजपर्यंत सरकारने जलसंधारणासाठी प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविले जाते. त्यातून काही पाणी जमिनीत मुरते, मात्र बरेचसे पावसाचे पाणी वाहून जाते किंवा बाष्पीभवनातून नष्ट होते. एकंदरीत पडणाऱ्या पावसापैकी 70 टक्के पावसाचे पाणी वाया जात असल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व पाणीटंचाईचा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकला नाही. पावसाचे पडणारे पाणी तातडीने जमिनीखाली नेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक दोन एकर जमिनीमध्ये उताऱ्याच्या बाजूला 20 फूट लांब व 5 फूट रुंद व 8 फूट खोलीचे खड्डे खोदून त्यामध्ये दगड गोटे भरून वरच्या बाजूला खडक मुरूम भरला जातो. अशा रेन गेन बॅटरीच्या माध्यमातून पावसाचे वाहून येणारे पाणी त्यामध्ये सोडले जाते. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पावसाचे 80 टक्के पाणी जमिनीमध्ये खालच्या बाजूला जाते आणि नंतर जमिनीखालच्या सर्व मुरुमामामध्ये हे पाणी पसरत सर्वत्र जमिनीखाली ओल तयार होते. या तंत्रामुळे जमिनीखाली सर्वत्र फळझाडे आणि पिकांच्या मुळांना सातत्याने वर्षभर ओल उपलब्ध होते. जमिनीखाली जमा झालेल्या पाणी साठ्यामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल. या तंत्रामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. जमिनीवर पडणारे पाणी त्यांच्याच जमिनीखाली वर्षभर साठवले गेल्याने पिकांसाठी ओल कायम राहणार आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिली, तरी फळबागांचे किंवा पिकांचे नुकसान होणार नसल्याचे म्हंटले आहे.
महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रेन गेन बॅटरी संदर्भात प्रचार-प्रसार संघटनेने सुरू केला आहे. शहरी भागात सगळीकडे सिमेंटची जंगले आहेत. डांबर किंवा सिमेंटचे रस्त्याच्या कडेला फरश्या बसविल्या जातात. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर काही एक पाणी जमिनीत मुरत नाही. रस्त्याकडील झाडे पाण्याअभावी मरून जातात. त्यामुळे शहरी भागात प्रत्येक रस्त्याच्या कडेला तीन बाय तीन फुटाची रेन गेन बॅटरी तयार करण्याचा प्रस्ताव संघटनेने मांडला आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी रेन गेन बॅटरीत सोडले जाऊ शकणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला झाडांना वर्षभर ओलावा टिकून राहिल आणि झाडे देखील जगणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.