पिंपरी जलसेन ची शाळा खाजगी शाळेलाही पडते भारी
एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम शिकवणारी बहुदा, ही पहिलीच शाळा
दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी होत चालल्याचे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असले तरी, जिल्हा परिषदेच्या काही शाळा मात्र खाजगी शाळांवरही भारी पडत आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन जिल्हा परिषदेच्या शाळेने गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला असून, परिसरातील बावीस गावातून येथे विद्यार्थी खाजगी बसने येतात. एखाद्या नामवंत इंग्रजी शाळेपेक्षाही या शाळेत प्रवेशासाठी उड्या पडत आहे. सातवीपर्यंतच्या या शाळेची पटसंख्या 375 आहे. यंदातर प्रवेशासाठी एवढ्या उड्या पडल्या की,200 ते 250 विद्यार्थ्यांना
जागेअभावी प्रवेश नाकरावे लागले. शैक्षणिक अभ्यासक्रमासह शिष्यवृत्ती चित्रकला, नवोदय प्रवेशाची तयारी, राज्य मंडळासह एनसीईआरटी अभ्यासक्रमाची उजळणी अशा विविध उपक्रमामुळे शाळेची गुणवत्ता एवढी वाढली आहे की, पालक या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लावत आहे. एवढेच नव्हे तर, परिसरातील 22 गावातून विद्यार्थी खाजगी बस करून शाळेत येत आहेत. तसेच लोकसहभागातून या शाळेत अनेक भौतिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. यात सुसज्ज वर्गखोल्या, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, ऑनलाइन क्लासही घेतले जातात. त्याबरोबरच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाची शाळेत उजळणी केली जाते. एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम शिकवणारी बहुदा ही पहिलीच शाळा असावी. त्यामुळे ही मुले कुठे, कोणत्याही माध्यमाच्या मुलांशी सहज स्पर्धा करू शकतात.