श्रीरामपूरमध्ये अकरा वर्षीय मुलावर ९ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार

आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल

श्रीरामपूर शहरातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ९ जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरातील एका ११ वर्षीय – अल्पवयीन मुलास ९ अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला. या पीडित मुलाने सदरची घटना उशिराने त्याच्या आईला सांगितली. आईने तातडीने पोलिस ठाणे गाठून सदरची घटना पोलिसांना सांगितली याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या अल्पवयीन आरोपी विरुध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील ९ जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले. अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी सदर अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची गांभीर्यता समोर आली आहे. अल्पवयीन मुलावरील अत्याचाराच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.