वंचित च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

अहमदनगर दक्षिण मधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान

अहमदनगर : 
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाची हवा डोक्यात शिरू न देता आपले पाय जमिनीवर ठेवून गाव पातळीवर समाज हिताचे कामे केली पाहिजेत असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर दक्षिण मधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान व सत्कारनिमित्त आयोजित बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.  वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशाताई शेख यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे झालेल्या या बैठकीत ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जेष्ठ सल्लागार प्रा. जीवन पारधे यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  यावेळी मार्गदर्शन करतांना किसन चव्हाण म्हणाले की, कार्यकर्त्यांनी गाव व तालुका पातळीवर ग्राम पंचायत, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, कृषी विभाग, वीज मंडळ, अशा कार्यालयात सर्व सामान्य माणसांची रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.  गाव निहाय, दलित, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त, मायक्रो ओबीसी, त्याच बरोबर गरीब मराठा अशा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते जोडावेत.  गाव पातळीवर बूथ कमिटी स्थापन कराव्यात.  निवेदने, धरणे, आंदोलन, उपोषणे, मोर्चा, रस्ता रोको अशा लोकशाही मार्गाने सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाज माध्यमांचा योग्य वापर करून प्रश्न सोडवावेत.  सर्व समावेश सार्वजनिक विषय हाताळावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रदेश प्रवक्त्या दिशा ताई शेख म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीमध्ये महिला कार्यकर्त्यांनाही विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेत.  महिला, पुरुष व युवकांसाठी, बचत गट स्थापन करून विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.  विविध शासकीय योजनांचा गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.  अहमदनगर दक्षिण व उत्तरेमध्ये योग्य तो समन्वय साधावा. आज झालेल्या नियुक्त्या म्हणजे आपल्यावर पडलेली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडणे हे कार्यकर्त्यासमोरील खरे आव्हान आहे.  या आव्हानाला समर्थपणे समोरे जावे.
आपल्या प्रास्तविक पर भाषणात वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे म्हणाले, सत्तेत जाणे हे आपले उद्दिष्ट आहे.  त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपासून या प्रक्रियेस प्रारंभ करून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगर पालिका व विधानसभा अशा सर्व निवडणुका आपण स्व बळावर लढणार आहोत.  गाव पातळीवरील हाडोळा मधील इनामी जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनीवर शेळी, गाय, म्हैस, म्हैस पालन, कुक्कुटपालन, मच्छीपालन असे व्यवसाय सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. असे ते म्हणाले.
यावेळी योगेश साठे, बंन्नू शेख, संतोष गलांडे, बाळासाहेब कांबळे, अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख, फिरोज पठाण, चंद्रकांत नेटके, नंदकुमार गाडे, चंद्रकांत डोलारे, प्रा. जीवन पारधे, सुनिल बाळू शिंदे, वसंत नितनवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.  या बैठकीस दत्तात्रय अंदुरे, ज्ञानदेव उच्छे, भाऊ साळवे, लखन घोडेराव, जगू गायकवाड, महेंद्र थोरात, सोमनाथ भैलुमे, सोन्याबापू वरगे, जिल्हा संघटक फिरोज पठाण,  भाऊ साळवे, अमर निरभवणे, सुनिल भिंगारदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून या बैठकीस प्रारंभ झाला. वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी प्रास्ताविक केले.  भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले.