PUNYAT PURACHI STISTHI KAYAM

पुण्यात पुन्हा पुराची भिती

पुणे – जिल्ह्यात मागील आठवडा भरापासुन पाऊस सतत बरसत आहे. मागील आठवड्यात पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण पूर्ण भरले होते. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्याने मुळा व मुठा नदीला पूर येऊन पुण्यातील काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. जनजीवन पूर्व पदावर येत असताना काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसत असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असुन, यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत 85.59% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आज सकाळपासून तब्बल 22 हजार 880 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धास्ती वाढली आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असुन, मुसळधार पावसामुळे पानशेत धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी धरणातून पहिल्यांदाच ४.१२% क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता. तर आज पहाटे ४ वाजता विसर्ग 15 हजार 136 क्युसेकने वाढवण्यात आला असुन नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.