यावर्षी शेवगाव बस आगाराला वीस लाखांचे उत्पन्न
शेवगाव आगाराच्या 57 बसेसच्या 14 दिवसात 127 फेऱ्या
शेवगाव : आषाढी एकादशीनिमित्त शेवगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. शेवगाव आगाराच्या एकूण 57 बसेस पंढरपूरसाठी सोडल्या होत्या. त्यामध्ये 9 ते 22 जुलै या 14 दिवसात या बसच्या 127 फेऱ्या झाल्या. प्रवाशांकडून शेवगाव आगाराला सवलतीसह एकूण 20 लाख 39 हजार 318 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार प्रमुख अमोल कोटकर व स्थानक प्रमुख किरण शिंदे यांनी दिली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्रीविठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी लाखो भाविक वारी करत असतात मात्र त्यांना पायी चालणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी शेवगाव बसस्थानकातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बसचे नियोजन केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा फेऱ्या वाढवल्या होत्या. त्यामुळे गतवर्षापेक्षा सुमारे दोन लाखांचे उत्पन्न वाढले आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पास व महिलांसाठी तिकीट दरात 50% सवलत दिल्याने महिला प्रवासी संख्येत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 22 जुलै दरम्यान आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त शेवगाव एसटी आगाराने भाविकांसाठी केलेल्या 34,176 किलोमीटर प्रवासी वाहतुकीतून आगाराला एकूण 20 लाख 39 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या कालावधीत 16,813 प्रवासी भाविकांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला. यात महिला प्रवासी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांचीही मोठ्या प्रमाणावर संख्या होती.