महापालिकेने सर्व विकासकामांची माहिती सोशल मीडियाद्वारे नगरकरांना द्यावी

भारतीय जनसंसदेची मागणी; उपायुक्तांना निवेदन

सुरु असलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणे हा त्यांचा हक्क -रईस शेख

नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या विकास कामांची माहिती सोशल मीडियावर सर्व करदात्या नगरकरांना मिळण्याची व सर्व विकास कामावर माहिती देणारे फलक लावण्याची मागणी भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन व शहराध्यक्ष रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, बबलू खोसला, अशोक डाके, सुनील टाक, प्रकाश गोसावी, अशोक भोसले, कैलास पटारे आदी उपस्थित होते.
महानगरपालिका स्वउत्पन्न निधीसाठी महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांकडून अनेक प्रकारचे कर, विकास निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा करत असतात. या जमा होणाऱ्या कराच्या रकमेबरोबरच राज्य सरकार, केंद्र सरकार, आमदार, खासदार निधीद्वारे विविध कामांसाठी निधी उपलब्ध होतो. तसेच विविध योजनांचा निधी देखील महापालिकेला मिळत असतो.
महानगरपालिकेचा स्वनिधी व इतर निधी विकास कामावर खर्च होत असतो. हा झालेला खर्च व झालेले विकास कामे करदात्यांना समजणे आवश्‍यक आहे. आपल्या समस्या अडचणी नेमके काय आहे?, तो विकास कामावर नेमक कुठे खर्च होतोय? हे सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही. त्याकरिता प्रत्येक प्रभागांमध्ये होणारे सर्व विकास कामांची प्रशासकीय मंजुरी, कार्यरंभ आदेश, बीलप्रत, मोजमाप पुस्तकातील नोंदी, देयक रजिस्टर मधील नोंदी इत्यादी बाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व करदाते नागरिकांना कळविण्यात यावे, याकरिता फार मोठ्या खर्चाची तरतूद करावी लागणार नाही व त्याचा फार मोठा आर्थिक बोजा महापालिकेवर येणार नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेचे सोशल मीडियावर अकाउंट असून, त्याद्वारे देखील ही माहिती प्रसिद्ध केली जाऊ शकते. सर्व माहिती खातेधारकांना सोशल मीडियाद्वारे विकासकामांची माहिती मिळणे आवश्‍यक असल्याचे म्हंटले आहे
महापालिकेच्या हद्दीत होणारा सर्वच विकास कामावर त्या कामाचा सविस्तर फलक लावणे बंधनकारक करावे. कामावर प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी, मंजूर अंदाजपत्रक, काम करणाऱ्या एजन्सीचे नाव व पत्ता, कार्यरंभ आदेश दिनांक, पूर्ण करण्याची तारीख व गुणवत्तेचे प्रमाणके इत्यादी माहिती होणारे प्रत्येक विकास काम, दुरुस्तीचे काम, देखभालीचे काम सेवा पुरवणाऱ्या सर्व कामावर फलक लावणे बंधनकारक करावे. या फलकावर कुठल्याही लोकप्रतिनिधीचे नाव असू नये, फलक 5 बाय 4 फुट आकाराचे असून पक्क्या ऑइल पेंट रंगाने वाचता येईल, असे अक्षराच्या आकारात असावे असे निवेदनात म्हंटले आहे. दोन्ही मागण्यांची दखल घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.

महापालिकेच्या विकास कामांची माहिती व आलेल्या निधी कोणत्या प्रकारे कसा खर्च केला जात आहे. याची पूर्णपणे माहिती नगरकरांना मिळत नाही. या माहितीद्वारे नागरिकांना सुरु असलेल्या कामावर देखरेख देखील चांगल्या प्रकारे ठेवता येणार आहे. ही माहिती नागरिकांना उपलब्ध होणे हा त्यांचा हक्क आहे. महापालिकेने देखील सर्व विकास कामांची माहिती सोशल मीडियाद्वारे नगरकरांना उपलब्ध करावी. तसेच सुरु असलेल्या विकास कामाच्या ठिकाणी प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारे फलक लावावे. -रईस शेख (शहराध्यक्ष, भारतीय जनसंसद)