मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव ते म्हणजे आई-बाप -डॉ. वसंत हंकारे
रामराव चव्हाण विद्यालयात रंगले न समजलेले आई बाप.. समजून घेताना! व्याख्यान
तब्बल परिसरातील 3 हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती
नगर (प्रतिनिधी)- आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला, तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही. याची जाणीव ठेवा, असे विचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले.
एमआयडीसी येथील रामराव चव्हाण विद्यालयात डॉ. वसंत हंकारे यांच्या न समजलेले आई बाप.. समजून घेताना या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. या व्याख्यानासाठी परिसरातील तब्बल 3 हजार शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भिमाजी कोकणे, उपाध्यक्ष कृषीभूषण सुरसिंगराव पवार, सचिव ज्ञानेश चव्हाण, सहसचिव नितीन घाडगे, विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे, पर्यवेक्षक दत्तात्रय दरेकर, वडगाव गुप्ताचे सरपंच विजयराव शेवाळे, भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख शामराव पिंपळे, उद्योजक सागर देशमुख, उद्योजक आकाश बारस्कर, रावसाहेब घाडगे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ बोबडे, भाजपा नगर तालुका अध्यक्ष रामभाऊ घाडगे, नागापूर ग्रामपंचायत सदस्य दीपक गीते, उद्योजक कातोरे, उमेश डोंगरे, गणेश डोंगरे, उद्योजक राजेंद्र लहारे, डॉ. बापूसाहेब डोंगरे, भानुदास काळे, ताराचंद डोंगरे, बापू नाना गव्हाणे, डॉ. बापू पवार आदींसह परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना हंकारे म्हणाले की, मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका, त्यांचे नाव उज्वल करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा. भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले, मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैश्यांचा उपयोग काय? हा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यां समोर मांडला.
आई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे, हे तुम्हाला चांगले माहिती आहे, लहानपणी आपल्याला आई-बाप कळत होते. आता मात्र तुंम्ही कॉलेजला जायला लागले, तुम्हाला बंधनात ठेवले जाते, असा तुमचा समज झाला आहे. त्यामुळे मम्मी-पप्पा तुंम्हाला आता आवडत नाही. आय हेट यू, मम्मी-पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागली आहे. परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले पूर्वीचे आई-बाप मिळण्यासाठी तुमचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे हंकारे यांनी सांगितले. या व्याख्यानात विद्यार्थ्यांसह पालक देखील भावूक झाले होते. तर डोळे उघडणारे व विचार बदलणाऱ्या या व्याख्यानास विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देवून आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.