सदाहरित रस्ते निर्माणातून निसर्गश्रीमंत भारत संकल्पनेचा केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांना प्रस्ताव

रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरी तंत्राचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रव्यापी सदाहरित रस्ते निर्माण करुन निसर्गश्रीमंत भारत संकल्पनेचा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने पाठविण्यात आला आहे. भारत निसर्गश्रीमंत होण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी नक्कीच सदाहरित रस्ते निर्माणाचा प्रस्ताव स्वीकारतील असा विश्‍वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
भारतात नैसर्गिक संपत्ती अमाप आहे विशेषतः देशाच्या सर्वच भागावर सुर्यप्रकाश चांगल्याप्रकारे पडतो आणि सरासरी भारतात मान्सूनचा पाऊस देखील चांगला होतो. या दोन गोष्टींचा चांगला फायदा करून देशात नव्याने होणाऱ्या रस्ते निर्माणातून सदाहरित रस्ते संकल्पना राबविल्यास भारत पुर्वीपेक्षा जास्त निसर्गश्रीमंत करता येणार असून, ते तंत्र म्हणजे रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरी असल्याचा संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभर पडणारा पाऊस भुगर्भात साठविण्यासाठी रेनगेन बॅटरीचा उपाय प्रभावी आहे. शहरी भागात वाढणारी सिमेंटची जंगले आणि डांबरी रस्ते यामुळे पर्यावरणाला फार मोठी हानी पोहोचते, परंतू रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरी या दोन्हींचा वापर केला तर पर्यावरणाचा ऱ्हास पुर्णपणे थांबवता येणार असल्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
निसर्गश्रीमंत भारत योजना राबविताना शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सर्वप्रकारचे दारिद्य्र संपविता येणार आहे. आपल्या भागात पडणारा पाऊस रेनगेन बॅटरीच्या माध्यमातून जमिनीखालच्या मुरूमांच्या पट्ट्यात दिर्घकाळ साठविता येतो. त्यासाठी जमिनीच्या उताराच्या बाजूला पन्नास फूट लांबीचा व वीस फुट रूंदीचा खड्डा ज्याची खोली दहा फूटापर्यंत खोल व हा खड्डा दगडगोट्या मार्फत भरला गेला पाहिजे आणि वरच्या बाजूला बारीक खडी टाकली पाहिजे. ज्यामुळे जमिनीखालच्या मुरूमाड भागात पाण्याचे साठे तयार होतील आणि या रेनगेन बॅटरी परिसरात फळबागांची लागवड उपयुक्त ठरून पाणी टंचाईमध्येसुद्धा किमान ओलावा टिकून राहतो. देशामधील लाखो एकर पड जमिनी जिरायत फळ लागवड खाली आणणे सोयीस्कर होणार आहे. शहरी भागामध्ये रस्त्याच्या कडेला रेनगेन बॅटरी झाडाच्या पाच ते दहा फूट लांब अंतरावर तीन फूट बाय तीन फूट लांबीचा व आठ ते दहा फूट खोलीचा खड्डा करून त्यामध्ये वीटाचे तुकडे, गोटे, दगड टाकून तो खड्डा भरून वरच्या भागात खडीने भरून घेऊन पावसाचे रस्त्यावर वाहणारे पाणी खड्डयाकडे वळते करायचे, ज्यामुळे त्या परिसरातील जमिनीखालचा किमान ओलावा वर्षभर टिकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुर्यप्रकाशाच्या ऊर्जेमुळे फोटोसिन्थेसीस प्रक्रियेत झाडे मोठ्याप्रमाणात वाढतात व त्यामुळे त्या परिसरातील हवा थंड राहते विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस होण्यासाठी ढग बनविणारे झाडे हे कारखाने आहेत. एकंदरीत शुद्ध हवा आणि भरपूर पाणी यातून संपुर्ण भारताला निसर्गश्रीमंत करता येणार आहे. ग्रीनगेन बॅटरीमुळे मोठ्या प्रमाणात हरित पट्टे तयार होऊ शकतात, त्यामुळे या दोन्ही संकल्पना एकाच वेळी राबविण्याचा प्रस्ताव संघटनेने मांडला आहे. निसर्गश्रीमंत भारत संकल्पना राबविण्यासाठी ॲड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, वीर बहाद्दूर प्रजापती, अशोक भोसले, विठ्ठल सुरम आदींसह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.