विमानातून आणलेले रेमडेसीवीर वाटले कोणाला ?”

खा. सुजय विखे यांना आ. नीलेश लंके यांचे प्रत्युत्तर

राजूर

 

काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले. तालुक्यातील पळशी येथे विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात लंके बोलत होते.

 

 

राजूर येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक काळे, सुजाता शेरखाने, आत्मा समितीचे अध्यक्ष राहूल झावरे, राष्ट्रवादी विदयार्थी माहीती व तंत्रज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, ठकाराम लंके, बाळासाहेब लंके, बापूसाहेब शिर्के, संदीप चौधरी, अजय लामखडे, दत्ता कोरडे, जगदीश गागरे, सत्यम निमसे, योगेश शिंदे, संदीप रोहकले, सुरज भुजबळ, बंडू कुलकर्णी, श्रीरंग रोकडे, अप्पासाहेब शिंदे, गणेश मधे, मिठू जाधव, गणेश हाके, प्रविण गागरे, सुखदेव चितळकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

 

कारोना काळात आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता. त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले. आ. लंके म्हणाले, पूर्वी तालुक्यातील पुढाऱ्यांना माझी भिती वाटायची आता जिल्हयातील पुढाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यांनीच विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन आणली. लोकांना व्हिडीओ  दाखविला. परंतू ती इंजेक्शन वाटली कोणाला ? असा सवाल त्यांनी केला. खा. विखे यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यावरही आम्ही उपचार करून कोरातून बरे केले.

 

 

 

 

 

त्याचा गाजावाजा आम्ही केला नाही. त्या कर्मचाऱ्यास खासदारांनी त्यांच्या रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. डॉक्टरांनी मात्र आम्हाला काही सांगितलेले नाही, आगोदर पैसे भरा व त्यानंतर उपचार करण्यात येतील असे सांगितले. पैसे नसल्याने तो कर्मचारी भाळवणी येथील आरोग्य मंदीरात दाखल झाला. एक रूपयाही खर्च न करता त्याने कोरोनावर मात केली. जिल्हयातही आम्ही सक्षम आहोत. असे आ. लंके म्हणाले.  स्वतःला नेते समजणारे तालुक्यातील पुढारी एजंटांच्या मार्फत काळाबाजार करीत होते. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. स्वतःला पुढारी समजणारे ३५ ते ४० हजारांना इंजेक्शन विकत होते.  या पुढाऱ्याने ही इंजेक्शन कुठून आणली, त्याचा वाटा तुम्हालाही मिळाला का असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी केला.

 

 

आम्हीही इंजेक्शन वाटले. जे माझ्याकडे आले  त्यांना मोफत दिली. छापील किमतीमध्ये आणलेली इंजेक्शन त्याच दराने रूग्णांपर्यंत पोहचविण्याचे काम माझ्या कार्यकर्त्यांनी केले असे ते म्हणाले. कोरोना महामारीमुळे ज्या प्रमाणात निधी आणयला पाहीजे होता तो आणता आला नसल्याची खंत आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली. मात्र गेल्या दिड वर्षांचा बॅकलॉग भरल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. के. के. रेंंजचा प्रश्‍न आपण शरद पवारांच्या माध्यमातून मार्गी लावला. राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पवार साहेबांनी एकाच बैठकीत निर्णय घेण्यास भाग पाडले.  काही लोक या भागात आले होते. के के रेंजसाठी या भागातील जमीन जाणार आहे असे सांगत होते.

 

 

 

हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात वकील लावून जमीनीचा जास्त मोबदला मिळवून देतो असे सांगितले जात होते. सहया गोळा करण्यासाठी त्यांच्या संस्थेचे कर्मचारीही फीरत होते. मी मात्र एक गुंठाही जमीन जाऊ देणार नाही या भुमिकेवर ठाम होतो. व पवार साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्‍न आपण मार्गी लावला असे सांगत आमदार नीलेश लंकेयांनी विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले.स्वतःपेक्षा समाजासाठी काय केले हे महत्वाचे आहे. राजकारणापायी संघर्ष करू नका या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यासपिठावर आहेत ही समाधानाची बाब आहे. सर्वजण निर्विघ्न जगा.

 

ग्रामपंचायत किंवा इतर निवडणूकीच्या रागातून वाद करू नका. तुम्ही एकत्र आल्यामुळे आता काही मंडळी वाद लावतील त्याकडे दुर्लक्ष करा. सर्वांना राजकीय ताकद दिली जाईल अशी ग्वाही देतानाच या भागातील सर्व प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे आमदार नीलेश लंके म्हणाले.