ऋषिकेश राऊत
अहमदनगर :-
मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तहसीलदार ज्योती देवरे यांची तडकाफडकी ने जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. विभागीय चौकशी अंतर्गत दोषी आढळल्याने ही बदली झाली आहे. तर दुसरीकडे तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी तक्रार केली आहे. आधीच अडचणीत असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.


तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य महिला आयोगाकडे पारनेरच्या लोकप्रतिनिधींकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रारही दाखल केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली होती. तसेच जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार देवरे यांनी केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आले नाही.
