रिपाईच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सुनील साळवे यांच्या नियुक्तीचा निर्णय आठवले यांच्या संमतीने -श्रीकांत भालेराव
जिल्हा कार्यकारिणी बरखास्त असल्याचा खुलासा; गटबाजी व बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा व इतर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या बळकटीकरणासाठी व सक्रीय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, संजय भैलुमे ना. आठवले यांची भेट घेऊन स्वत: जिल्हाध्यक्ष असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याच्या खोट्या बातम्या पसरवित असल्याचा खुलासा राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केला आहे. तर पक्षात गटबाजी करुन टीका व बदनामी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या आदेशावरून शासकीय विश्रामगृह येथे 19 ऑगस्ट रोजी राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी आणि सर्व विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. सुनील साळवे यांना दक्षिण प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 2022 नंतर पक्षातील जे कार्यकर्ते क्रियाशील सदस्य झाले आहेत, त्यांच्या मदतीने राहिलेल्या कार्यकर्त्यांना गाव शाखा, वार्ड शाखा, पंचायत समिती, जिल्हा परिषद गण, गट, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी क्रियाशील करण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत बैठकी एक मत झाले असून, बैठकीतील सर्व वृत्तांत ना. आठवले यांना देण्यात आलेला आहे.
दक्षिणची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे, परंतु संजय भैलुमे यांनी सात ते आठ लोकांना व एका तालुकाध्यक्षाला घेऊन आठवले यांची भेट घेऊन फोटो काढले आहे. यावरुन ते आपण जिल्हाध्यक्ष असल्याच्या बातम्या पसरवित आहे. मला संमती दिल्याच्या खोट्या बातम्या त्यांनी प्रसिद्ध केल्या असून, अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील केलेले बदल पक्ष हितासाठी घेतलेले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात भालेराव यांनी म्हंटले आहे.
सदर बदल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांच्या आदेशावरून करण्यात आले असून, लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष नेतृत्वावर टीका करून व पक्षात गटबाजी वाढविल्याने पक्षाचे नुकसान झाले आहे. पक्षात वाढवलेली नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात पक्ष नेतृत्वावर व खालच्या पातळीवर जाऊन टीका व बदनामी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भालेराव यांनी दिला आहे.