शहरात जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान

गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना

गोहत्येचे अनेक गुन्हे असलेल्यांवर मोक्कातंर्गत कारवाई होण्याची गरज -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- गोरक्षक मित्र परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना करुन जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान करण्यात आला. नगर-मनमाड रोड येथील वृंदावन लॉनमध्ये गोरक्षक एकवटले होते.
गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ (नाना) आठरे पाटील, पारसनाथजी महाराज, महंत संगमनाथ महाराज, योगी बालकनाथ आदींसह हिंदू समजाबांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गोरक्षकांना एकत्र आणून त्यांना बळ देण्याचे काम या उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे. गोरक्षक हे आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम करत आहे. गोहत्या करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून त्यांचे कार्य सुरू आहे. एकाच व्यक्तींवर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल होत असतील, तर अशा व्यक्तींवर मुक्कातंर्गत कारवाई होण्याची गरज आहे. यासाठी कायद्यात दुरुस्ती होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. सरकारने पूर्णतः गोहत्या प्रतिबंधासाठी कायदा अस्तित्वात आणला आहे. काही प्रवृत्ती हिंदूंना त्रास देण्यासाठी गोहत्या करत असतील तर त्यांना ठेचून काढण्यासाठी लढा निर्माण करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात गोकुळ (नाना) आठरे पाटील म्हणाले की, आपल्या जीवाची पर्व न करता आपल्या संस्कृतीचे व गो मातेच्या रक्षणासाठी गोरक्षक योगदान देत आहेत. त्यांचा समाजात सन्मान होणे गरजेचा आहे. गोरक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्या मदतीला कोणी येत नाही, जेलमध्ये गोरक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे स्वत: अनुभवलो असल्याने त्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. गोरक्षकांना एकजूट करुन दिशा देण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी हर्षताई ठाकूर यांनी हिंदू धर्मावर स्फूर्तीदायी व प्रेरणा देणारे व्याख्यान दिले. त्यांनी युवक-युवतींना धर्माच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. गोरक्षक निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत. त्यांचा समाजात झालेला सन्मान आनखी जोमाने कार्य करण्यास बळ निर्माण करणार असल्याची भावना गोरक्षकांनी व्यक्त केली.