साई मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार

नियम व अटी पाळण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन

साई मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार

 

शिर्डी,दि.15 : राज्य शासनाने आदेशित केल्यानुसार येथील श्री साईबाबा मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून भविकांसाठी सुरु होणार असून, भाविकांनी प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले. शिर्डी येथील साई मंदिर सुरु करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली श्री साई सभागृह येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंदिर सुरु करण्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे, नगराध्यक्षा अर्चना कोते, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,पोलीस उप अधीक्षक राहूल मदने, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपस्थित होते.

नियम व अटी पाळण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन

श्री साईबाबा संस्थानने भाविकांना सुलभतेने व सुरक्षितपणे दर्शन घेता यावे यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. उद्यापासून ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना साई मंदिरात काकड आरतीपासून दर्शन घेता येणार आहे. दररोज सहा हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. ऑनलाइन नोंदणीद्वारे तीन हजार आणि तीन हजार बायोमेट्रिक पास घेणाऱ्यांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. स्वच्छता, सॅनिटायझरच्या वापरासह सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे, भाविकांच्या सुरक्षेसाठी साई संस्थानने आवश्यक सर्व व्यवस्था केली असून त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. भाविकांना फुल, हार व प्रसाद मंदिरामध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरातील दोन नंबर प्रवेश द्वारातून भाविकांना प्रवेश देण्यात येणार असून पाच क्रमांकाच्या दरवाजातून भक्तांना बाहेर सोडण्यात येणार आहे. पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दहा वर्षाच्या आतील बालकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मंदिरासोबत श्री साईबाबा संस्थानचे प्रसादालय तसेच भक्तनिवासही सुरु होणार आहे. देश-विदेशातील भाविकांनी दर्शनाची वेळ व तारीख निश्चित करूनच दर्शनासाठी शिर्डीमध्ये यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली. जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शनपर सूचना करुन दर्शनरांग व साईप्रसादालय येथील व्‍यवस्‍थेची यावेळी पाहणी केली.

प्रशासनाने केलेल्या सूचना व अटींचे पालन भाविकांनी व स्थानिकांनी करावे असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले.

000