कला आनंद देणारे प्रभावी माध्यम आहे – संजय दळवी
अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षांचा निकाल शंभर टक्के
चित्रकला ग्रेड परीक्षा ए श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार
नगर – कला कोणतीही असो ती आनंद देते. सर्व ललित कलांची निर्मिती ही मुळात समाजात आनंद निर्मितीसाठीच झालेली असून कला अभ्यासाने जीवन समृद्ध होते असे प्रतिपादन नगर मधील प्रसिद्ध फोटोग्राफर संजय दळवी यांनी शासकीय चित्रकला परीक्षेत विशेष यश संपादित विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभ प्रसंगी केले. या परीक्षा कला क्षेत्रात प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांनाच ही कला इन्स्टिट्यूट शहरातील कलात्मक वातावरण जपत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे कला उपक्रम अशोका आर्ट गॅलरीमध्ये नियमित राबवीत आहेत हे आवर्जून सांगितले.
अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध फोटोग्राफर संजय दळवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी दळवी बोलत होते. यावेळी अशोक डोळसे, संचालिका सौ.हर्षदा डोळसे, सन्मान डोळसे, सौ.प्रीती काठेड, कु.भक्ती चौधरी आदी उपस्थित होते.
इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. हर्षदा डोळसे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून इन्स्टिट्यूट मार्फत राबविण्यात येणार्या कला उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट मार्फत विविध लोककलांच्या कार्यशाळा कला प्रात्यक्षिके पर्यावरण पूरक गणपती बनवा कार्यशाळा टाकाऊतून टिकाऊ निर्मिती कार्यशाळा देश प्रेम पर्यावरण वाचवा वृक्ष वाचवा आधी सामाजिक विषयावर पोस्टर चित्र स्पर्धांचे आयोजन इन्स्टिट्यूट मार्फत करण्यात येते. या परीक्षांना प्रथम परीक्षेत अ श्रेणी मिळविणार्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट मार्फत पुढच्या वर्षीपासून विशेष कला स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. कलाक्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक एम. एच. ए ए सीईटी., बी.एफ.ए., एम.एफ.ए., एन.आय.डी.,नाटा, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन इ. कला क्षेत्रातील प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येते.
पाहुण्यांचा परिचय व सन्मान अशोक डोळसे यांनी केला. या इन्स्टिट्यूट मध्ये अभ्यासासोबत कलाक्षेत्रातील महत्त्वाची माहिती व करियर मार्गदर्शन अतिशय उत्तम होते. येथे केवळ परीक्षार्थीच नव्हे तर खर्या अर्थाने कलात्मक विचार करणारे विद्यार्थी घडत आहेत असे मनोगत पालकांच्या वतीने आर्किटेक सौ. प्रीती काठेड यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार कु. भक्ती चौधरी हिने मानले. मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.