सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या ‘त्या’ जागेची विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा देण्यास धर्मादाय उपायुक्त यांचा मनाई हुकूम
अहमदनगर (प्रतिनिधी) : पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वस्तीगृहाच्या जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे.
हिंद सेवा मंडळाचे आजीव सदस्य वसंत लोढा, काँग्रेस नेते दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त श्रीमती यु एस पाटील यांच्याकडे ज्येष्ठविधीज्ञ अभिजीत पूप्पाल यांच्यामार्फतअर्ज करून या जागेचा विक्री व्यवहार करू नये यासाठी दावा दाखल केला होता. धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे दाखल अर्ज क्रमांक 195/2024 नुसार धर्मादाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करीत हा मनाई आदेश दिला आहे. हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात असलेली हॉटेल ओबेराय शेजारी असलेली सिटी सर्वे नंबर 161/1 प्लॉट नंबर 43अ मधील तीन एकर 29 गुंठे जागा कवडीमोल भावाने विकण्याचा घाट घालण्यात आला होता. हिंद सेवा मंडळाची मोक्याची असलेली कोट्यावधी रुपयांची जागा कवडीमोल भावात हस्तांतरित करण्याचा हा कट होता.
मंडळाने यासाठी सर्वकाही कायदेशीरपणे चालले आहे असे दाखवण्याचा साळसूदपणा करत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या या मंडळाच्या सदस्यांना खोट्या भूल थापा दिल्या. मंडळाने यासाठी 21 जानेवारी 2024 रोजी खास सर्वसाधारण सभा आयोजित केली. त्या अगोदर दिनांक 3 जानेवारी रोजी हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. या जागेचा ताबा मंडळाने सोडावा आणि बदल्यामध्ये इमारत बांधून घ्यावी अशा आशयाच्या अरुण बलभीम जगताप आणि हर्षल संतोष भंडारी यांच्या अर्जाबाबत या बैठकांमध्ये चर्चा झाली. कार्यकारणीच्या बैठकीत हा अर्ज एकमताने मंजूर करण्यात आला. सर्वसाधारण सभेत देखील याला मंजुरी देण्यात आली
याला ब्रीजलाल सारडा, मकरंद खेर, अनंत देसाई, मधुसूदन सारडा, विष्णू सारडा, श्यामसुंदर सारडा यांनी विरोध केला होता.
या विषयाला काही सदस्यांचा विरोध असताना हा विषय मंजूर करून कायदेशीर करण्याचा घाट घातला.
ही जागा सरकारी किंमत 32 कोटी असताना ती 25 कोटी ला हस्तांतरित करण्याचा डाव टाकला. या जागेवर जर बांधकाम झाले तर चालू बाजार भावा प्रमाणे त्याची किंमत 400 कोटी रुपयांच्या घरात जाते. देवस्थानची इनाम वर्ग 3 ची देवस्थान ही मिळकत हिंदसेवा मंडळाच्या ताब्यात अवघ्या पाचशे रुपये प्रति वर्षाप्रमाणे आहे. 1964 सालापासून मंडळाकडे असलेल्या या जागेचा करार आणखी 40 वर्ष शिल्लक आहे. या जागेवर सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी वस्तीगृह होते. मंडळाने या वस्तीगृहाची इमारत मोडकळीस आल्यानंतर त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आणि मोडकळीस आलेली इमारत पाडली. आणि भूखंडाचे श्रीखंड करण्याचे कारस्थान मंडळाचे विश्वस्त अजित सीमरतमल बोरा यांनी रचले. त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य यांची मदत घेण्यात आली. धर्मादाय आयुक्त यांची परवानगी न घेता हा व्यवहार करण्यात आला. ताबा सोडण्याच्या बदल्यात सारडा कॉलेजला 25 कोटी रुपयांची इमारत बांधून देण्याचे ठरले. प्रत्यक्षात असे करता येते का? मंडळाला इतकी मोठी रक्कम वस्तू स्वरूपात जमिनीचा व्यवहार म्हणून घेता येते का ? याची कोणतीही शहानिशा न करता बेकायदेशीरपणे संगणमताने कटकारस्थान रचले. फसवणूक, ठकवणूक करण्याच्या दुष्ट हेतूने करण्यात आले.
या विरोधात वसंत लोढा, दीप चव्हाण आणि संजय घुले हे उभे राहिले त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून त्यांनी धर्मादाय श्रीमती यु एस पाटील धर्मादाय उपायुक्त अहमदनगर विभाग, अहमदनगर यांच्याकडे तक्रारी केल्या तर त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस पाठवण्यात आली.
तरीदेखील या कथीत गैर व्यवहाराचा परदा फाश करण्याचा त्यांनी चंग बांधला. आणि एका चांगल्या शिक्षण संस्थेची मोक्याची जागा कवडीमोल भावात जे अर्जदार आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता आयुक्तांनी या व्यवहाराचा मनाई आदेश जारी केला आहे आणि पालक म्हणून मंडळाच्या विश्वस्त आणि सदस्यांना निर्देश दिले आहेत.