कवयित्री सरोज आल्हाट यांना केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार जाहीर
श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या काव्य संमेलनात होणार गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवियत्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने कविवर्य केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त सहावे राज्यस्तरीय काव्य संमेलन होणार असून, यामध्ये मान्यवरांच्या हस्ते आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे यांनी दिली.
सरोज आल्हाट गेल्या 30 वर्षापासून साहित्य व सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्या अनेक वर्षापासून काव्यलेखन करत असून, त्यांचे अश्रूंच्या पाऊलखुणा, सखे, कविता तुझ्या नी माझ्या, अनन्यता असे चार काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक इंग्रजी व मराठी मासिकांचे संपादन त्यांनी केले आहे. दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बालकल्याण, परित्यकत्या, आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्न, कुष्ठरुग्ण, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, एड्सग्रस्त या घटकांसाठी त्या सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची कार्याची दखल घेऊन त्यांना कविवर्य केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.