सावित्री ज्योती महोत्सवातील बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी काळ भात, गावरान तुप, नाचणीचे बिस्किटल व चटण्या-लोणच्याला मागणी

नगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने सावित्री ज्योती महोत्सवात भरविण्यात आलेल्या बचतगटांच्या विविध वस्तू, खाद्य पदार्थ व अन्न-धान्याच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात लावण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या विविध स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होत आहे.
राजूर (ता. अकोले) येथील हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी काळ भात, आवळ्याचे विविध खाद्य, घरगुती मसाले, जळगाव येथील मुखवास, संगमनेर येथील पंचामृत स्वादिष्ट मेवा, मातीचे भांडे, जामखेड येथील लाकडी काठवट, उलथने, पोळपाट, साई दरबारची स्पेशल पाव भाजी, कर्जतची शिपी आमटी, विविध चटण्या, लोणचे, खानदेशी केळीचे वेफर्स, राजुरचे प्रसिद्ध पेढे, नाचणीचे बिस्किटे, उन्हाळी पदार्थांना मागणी वाढत आहे.
प्रदर्शनातील महिलांचे विविध प्रकारचे कपडे, हर्बलचे सौंदर्य प्रसाधने, मेकअप साहित्य, महिलांचे पर्स, गिफ्ट आर्टीकल्स, गॅझेट, ज्वेलरी, बांगड्या खरेदीसाठी महिला वर्ग गर्दी करत आहे. तसेच खाऊ गल्लीतील सोयाबीन चिल्ली, कच्ची दाबेली, साबुदाणा वडे, हुलग्याचे शेंगोळे, पनीर चिल्ली, वेगवेगळ्या प्रकारचे केक, हुरडा, मुगाचे भजे, राजस्थानी डाल बाटी, उकडीचे मोदक, पाणीपुरी, आईस्क्रीम, बदामशेक, थालपीठ, सोलापुरी शेंगदाणा चटणी आदी विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी झुंबड उडत आहे. या चार दिवसीय बचत गट प्रदर्शनात लाखो रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे यांनी दिली. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्वागत अध्यक्ष किशोर डागवाले, डॉ. दिलीप जोंधळे, ॲड. सुरेश लगड, निलेश रासकर, रावसाहेब मगर, ॲड. धनंजय जाधव, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. विद्या शिंदे, रजनी ताठे, आरती शिंदे, अनिल साळवे, दिनेश शिंदे, जयेश शिंदे, अनंत द्रविड, जयश्री शिंदे, मीना म्हसे, अश्‍विनी वाघ, कावेरी कैदके, सुहासराव सोनवणे, बाळासाहेब पाटोळे, संतोष लयचेट्टी, कल्याणी गाडळकर परिश्रम घेत आहेत.